भारतीय संसदीय लोकशाहीत विरोधकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच भान विरोधकांना आहे का? यंदाच्या कोविड काळात जे अधिवेशन झालं त्यात विरोधकांनी काय साध्य केलं? उलट सरकारने त्यांना हवे तसे फासे टाकून परिस्थिती त्यांना हवीतशी बनवली हे लोकशाही समाज म्हणून आपल्या लक्षात आलं का? #म 1/n
परवा राज्यसभेत जो गोंधळ झाला त्याची जबाबदारी सरकारची असली तरी विरोधकांनी योग्य डावपेच आखून संसदीय आयुधांचा वापर कुशलतेने करणे गरजेचे होते..संख्याबळ कमी असल्याने तर ती महत्वाची अटच होती. ज्या फार्म बिल्स वरून संसदेत गदारोळ झाला..त्यासाठी आता रस्त्यावर उतरून काय फरक पडेल? 2/n
आता सरकार आणि त्याचे पाठीराखे 'बघा विरोधकांना संसदेत चर्चा नको आणि रस्त्यावर दंगा हवाय.' असा प्रचार करताना दिसत आहेत. त्यातील सत्यता विरोधकांनी कितीही ओरडून सांगितली तरी काही फरक पडेल असे वाटत नाही..कारण फार्म बिल्स कशी शेतकरी फायद्याची आहेत याचे संदेश बातम्या आणि चर्चा यातून3/n
सरकार पसरवू लागले आहे.म्हणजे हुकूमशाही वृत्तीने अध्यादेश आणून ही तो कायदा पारित करण्यात सरकार यशस्वी झाले. याउलट विरोधकांचे आठ शिलेदार निलंबित झाले..त्यांच्यासाठी बाकी कामकाजावर बहिष्कार घालून सरकारला चर्चेविना लेबर बिल पास करण्यास विरोधकांनी मदतच केली असे म्हणण्यास वाव आहे.4/n
आता शेतकरी आणि बाकी रस्त्यावर उतरले आहेत पण ते फार काळ तसे करू शकत नाहीत कारण त्यांच्यासमोर तसा काही सुचिबद्ध कार्यक्रम नाही..सरकार त्यातील बऱ्याच संघटनात फूट पडणार हे इतिहासावरून सिद्ध आहे.विरोधक किती काळ ट्विटर आणि फेसबुकवर फक्त गाऱ्हाणी गाणार हा खरा प्रश्न आहे.5/n
आता येत्या काही काळात राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ अजून कमी होईल..राज्यसभेत 243 सदस्यांपैकी 86 हे भाजपचे आहेत..येत्या दिवसात 11 सदस्य निवृत्त होतील.नवीन जे निवडले जातील त्यातील विरोधकाना एकही सीट मिळण्याची शक्यता नाही..त्यावेळी भाजपचे 94 सदस्य होतील..तेंव्हा विरोधक काय करतील?6/n
त्यासाठी संसदीय कायदेशीर नियम आणि आयुधांचा खुबीने वापर करणारे मुरब्बी राजकारण गरजेचे आहे.जे सरकारवर नाराज आहेत किंवा न्यूटरल आहेत त्यांना सभात्याग करायला लावून सरकारला कोंडीत पकडून चर्चेस भाग पाडायची रणनीती गरजेची आहे.धांगडधिंगा घातलाकी जनतेच्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहतं.7/n
त्याने विश्वासार्हता गमवण्याचा धोका आहे. तो धोका टाळायचा असेल तर बेरजेचे राजकरण शिकायला हवे अन्यथा ही वजाबाकी ही विरोधकांच्या पाचवीलाच पुजलेली असेल.पक्ष म्हणून तुमचे काय व्हायचे ते होवो.. पण तुमच्या आडमुठ्या धोरणाने लोकशाही आणि पर्यायाने समाजाचा जीव जाऊ नये एवढंच. ❤ n/n
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.