समुद्राच्या काठावर वाळूत बायांचा घोळका बसला होता, जुन्यापूराण्या अगदी जीर्ण झालेल्या लुगडंयानी त्यांनी अंग झाकलेली होती, आसपास त्यांची पोर खेळत होती, थोड्या उत्सुकतेने मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची माहिती विचारू लागले, एका वयस्कर बाईला मी विचारले, बाई कुठून आलात तुम्ही ? ती
म्हणाली, अकोल्याकडे आमचं गाव हाय, मी विचारलं एवढ्या लांबून इकडे कश्याने आलात,आगनगाडीने,,तिकीट काढून आलात का?तिने सांगितले, नाय बाय,, तिकीट काढायला आमच्याकडे पैसे कुठले..!तसंच आलो बिनतिकीट, पण काय सांगू बाय, तीकिटवाला साहेब आला अन आम्हाला तिकीट इचारायला लागला, आमच्याकडे तिकीट नाय
सांगितल्यावर आम्हाला शिव्या द्यायला लागला, मी त्याला म्हणले साहेब शिव्या कशाला देता? आम्ही गरीब माणसं आहोत,, तर म्हणतो, आंबेडकराने तुम्हाला हेच शिकवलं का ? चला उतरा खाली,,!पुढे ती म्हणाली मला लय राग आला म्हटलं आम्हाला शिव्या दे रे साहिबा, पण आमच्या आंबेडकर बाबाला कायबी बोलू नकोस,
तसा तो चिडला,, आणि त्याने माह्या थोबाडीत मारली बया,, मला ढकलत खाली ढकलाया लागला, सर्व बाया त्याच्या पाया पडल्या तेव्हा तो गेला,,मी विचारले,, काही खाल्लं का तुम्ही,,? तर ती म्हणाली, चाय पावावर दोन दिवस होतो, इथं मुंबईत आल्यावर इथल्या लोकांनी जेवण वाटले ते खाल्ले,, हे ऐकून मी तिला
म्हटले, बाई एवढ्या लांबून इथं कश्याला आल्यात? तिकडेच बाबाच्या फोटोला अभिवादन करायचं कि,, इतके हाल सोसून यायचं नव्हतं... पण तीच उत्तर विलक्षण होत, ती म्हणाली,, बाय बापाला भेटायला माहेरीच यावं लागत ना? आमचा बाप इथे झोपला, मग हेच आमचे माहेर नाय काय,,?