सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी प्रकट होते- शब्दांनी, अधूंनी, आणि कृतींनी. काव्य हे या भावनेचे पहिले सुंदर स्वरूप. पण काव्यातील शब्द कितीही सुंदर असले तरी शेवटी ते वाऱ्यावरच विरून जातात. अश्रू हे या भावनेचे दुसरे रमणीय रूप
पण माणसाच्या क्षुब्ध हृदयसागरातून बाहेर येणारे हे मोती शेवटी मातीमोलच ठरतात! डोळ्यांतल्या पाण्याने मनुष्य स्वतःच्या हृदयातली आगसुद्धा शांत करू शकत नाही. मग जगातला वणवा तो काय विझविणार? सभोवतालचे दुःख पाहून व्याकुळ झालेले माणसाचे मन हलके करण्यापलीकडे शब्द
आणि अश्रू यांच्यात सामर्थ्य असत नाही.
या भावनेचे तिसरे स्वरूप स्वरूपच मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने किंवा डोळ्यांनी बोलत नाही. ती नेहमी हातानेच बोलते. स्वतःचे रक्त शिंपून ती इतरांचे जीवन फुलविते.