लॉकडाऊनमध्ये "काहीतरी" शिकायला हवं - तर मग - जीवनाला कायमस्वरूपी दिशा देईल - असं काहीतरी शिकायला मिळणार असेल तर?!
२२ मार्चला जनता कर्फ्यू झाला. २३ पासून लॉक डाऊन सुरु झाला. पहिल्या ३-४ दिवसांत अनेकांनी "नवनवीन गोष्टी शिकण्याची ही संधी आहे" हे लिहून, सांगून झालं. +
कोणतीही गोष्ट २१ दिवस सतत केल्याने तिची सवय होते असा नियम आहे. तो नियम या लोकडाऊनमध्ये उपयोगात आणण्याचं अनेकांनी सुचवलं.
अगदी न्यू ईयर रिझॉल्युशन्स सारखं होतं हे!
त्यावेळी मीसुद्धा काही गोष्टी ठरवल्या होत्या. त्यातील एक म्हणजे आपल्या विचारांना शक्य तितका ठोस आकार देणे. +
सुदैवाने, मला या फ्रन्टवर एक खजिनाच सापडला. या लॉकडाऊनमध्ये माझ्यासाठी सर्वात चांगलं काही घडलं असेल तर मला झालेला Stoicism या तत्वज्ञानाचा बोध. (हा शब्द पूर्वीच ऐकला होता, वरवरचा अर्थ माहिती होता. पण खरी ओळख आत्ताच झाली.) +
एक आंत्रप्रेन्युअर म्हणून माझ्या कळत नकळत जसं जगण्याचा प्रयत्न करत होतो - त्या जीवनपद्धतीवर आधारित एक प्राचीन डीप फिलॉसॉफी आहे - तिच्यामुळे जीवन जगण्याचं ठाशीव, रेखीव फ्रेमवर्क मिळतं - हे कळणं आणि ती फिलॉसॉफी अभ्यासण्यासाठी पुरेसा वेळ मिळणं - हे माझ्यासाठी या लॉकडाऊनचं वरदान! +
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या, ज्याने बहुदा आपल्या भारतीय हिंदू तत्वज्ञानावर सर्वाधिक छाप पाडला आहे, त्या -
कर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।
संदेशाच्या अगदी जवळ जाणारी फिलॉसॉफी म्हणजे स्टॉइसिझम. +
३ ऱ्या शतकात ग्रीसमध्ये या तत्वज्ञानाला धुमारे फुटले. पुढे अनेकांनी हे तत्वज्ञान आत्मसात केलं, त्याला आकार दिला, भर घातली.
कालानुरूप स्टॉइसिझममध्ये बदल घडत गेले. विविध विचारवंतांनी - जे व्यावहारिक जगात अतिशय यशस्वी होते - आपापल्या लेखनाद्वारे स्टॉइसिझमची बांधणी केली. +
"आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर रडत न बसता, त्याची तक्रार करण्यात वेळ-ऊर्जा न घालवता, आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित करणे"
- बस्स या एका वाक्यात "स्टॉइसिझम म्हणजे काय" हे सांगून होतं!
सिम्पल. एलेगंट. इफेक्टिव्ह. +
अर्थात, आपण हे वा या प्रकारचे इतर अनेक वाक्य नेहेमी वाचतो. मान डोलावतो आणि दुसऱ्या क्षणाला कोरोनामुळे थंड पडलेल्या इंडस्ट्रीच्या चिंतेत बुडून जातो.
स्टॉइसिझम ही एक फिलॉसॉफी म्हणून अंगिकारण्याचा इथेच फायदा होतो. +
अनेक तत्ववेत्यांनी या एका केंद्रीय संकल्पनेच्या भोवती विविध विचार आणि आचारांचं जाळं विणलं आहे. महत्वाचं म्हणजे, "तत्वज्ञान" म्हणजे अभिजनांच्या अभिजनांच्या अभिजनांनी बौद्धिक आनंदासाठी जडजड संकल्पनांवर तासन्तास चर्चा करणं - असा जो आपला समज आहे, त्यापासून हे अगदीच वेगळं आहे. +
स्टॉइसिझममधील मनन-चिंतन-लेखन सोपं, सुटसुटीत असतं. "जीवनाच्या अलीकडे नि पलीकडे काय आहे", "हे ब्रह्माण्ड का निर्माण झालं" वगैरे जड जंजाळ गोष्टींमध्ये स्टॉइसिझम फारसं पडत, अडकत नाही. +
मी या इहलोकात जगतोय, इथे जगताना मला सुखी समाधानी जगायचं आहे, नकोश्या गोष्टी मला नको आहेत, मला दुःख वेदना पीडा नको आहेत, मला सुख आरोग्य समृद्धी ऐश्वर्य हवंय - या साध्या सोप्या स्वप्नांभोवती जीवन उभं करणाऱ्या सामान्य माणसाने - आणि मी आधी म्हणालो तसं, - +
खासकरून माझ्यासारख्या आंत्रप्रेन्युअरने - स्वतःचे विचार, आणि त्यावरून स्वतःचे आचार कसे घडवावेत...ते तसेच का घडवावेत...या सगळ्याचा रोडमॅप म्हणजे स्टॉइसिझम.
तिसऱ्या शतकात जन्मलेलं हे तत्वज्ञान आता जगभरात हळूहळू जोर धरतंय. +
जगभरात कर्तृत्व गाजवणाऱ्या अनेकांना या तत्वज्ञानाने स्पष्ट दिशा दिली आहे. आणि का देऊ नये! अगदी प्रिलिमनरी वाचन केलं तरी या तत्वज्ञानाची शक्ती जाणवते. +
अर्थात, स्टॉइसिझम अधिकारवाणीने "प्रवचन" द्यावं, इतका खोल अभ्यास मी केलेला नाहीये. आत्ता कुठे "स्क्रॅचिंग द सरफेस" झालं आहे. पण जे काही शिकलोय, शिकतोय खरोखर अमेझिंग आहे. +
प्रत्येकाने किमान जुजबी ओळख तरी करून घ्यावीच असं आहे हे. आणि त्यासाठी फार कष्ट नाहीत. dailystoic.com वर जा. त्यांचा ७ दिवसांचा फ्री कोर्स करा. ७ दिवस, ७ ईमेल येतात. थोडीथोडी ओळख करून दिली जाते. त्यांचं डेली न्यूजलेटर पण सुंदर आहे. गुगल केलंत तर अजूनही मटेरियल सापडेल. +
सुरुवातीला म्हणालो तसं - लॉकडाऊनमध्ये "काहीतरी" शिकायला हवं - तर मग - जीवनाला कायमस्वरूपी दिशा देईल - असं काहीतरी शिकायला मिळणार असेल तर आणखी काय हवंय? :)
चिअर्स!
ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
