मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज निसर्ग चक्रीवादळ संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
#NisargaUpdates
आपल्याला कल्पना आहे, गेल्या वेळेला आपल्याशी बोलताना मी महाराष्ट्राच्या सीमेवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाचा इशारा दिला होता. हे चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आताच्या परिस्थितीनुसार साधारणतः उद्या दुपारपर्यंत अलिबाग येथे धडकण्याची शक्यता आहे.
हे वादळ कदाचित इतर वादळांपेक्षा मोठं असेल. जो अंदाज व्यक्त केला जातोय, त्यानुसार १००-१२५ किमी वेगाचे वारे वाहतील. हे वादळ चक्रीवादळ आहे. नासधूस करत हे वादळ पुढे जाणार आहे. प्रार्थना हीच आहे की आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत वादळाचा जोर ओसरावा किंवा हे वादळ हवेतल्या हवेत नाहीसे व्हावं.
आपण सज्ज आहोतच. आर्मी, नेवी, एअरफोर्स या सगळ्यांना आपण सज्ज राहण्याचे इशारे दिले आहेत. NDRF च्या १५ तुकड्या, SDRF च्या ४ तुकड्या अशा एकूण १९ तुकड्या जिथे आवश्यकता आहे तिथे तैनात केल्या आहेत. अतिरिक्त मदत म्हणून ५ तुकड्या तयारीत ठेवल्या आहेत.
काल आपल्या देशाचे गृहमंत्री @AmitShah यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली. त्यात त्यांनी आढावा घेतला. थोड्या वेळापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले आहे की तुम्ही तयारी तर केलेली आहे, पण केंद्र सरकार सुद्धा तुमच्या सोबत आहे.
मी आपल्याला विनंती करतो की विशेषत: किनारपट्टी आहे तिथे उद्या व परवा हे २ दिवस महत्त्वाचे आहेत. दोन्ही दिवस आपण घरामध्येच राहणे हिताचे आहे. जे कार्यालय, उद्योग, इतर गोष्टी सुरू झालेल्या असतील त्या गोष्टी उद्या व परवा बंद राहतील. घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणे यात आपले हित आहे.
आपण जी तयारी केली आहे ती मनुष्यहानी किंवा प्राणहानी होऊच नये अशा पद्धतीने केलेली आहे. किनारपट्ट्यातील मच्छिमारांना संपर्क झालेला आहे. पालघरमधील काही मच्छिमार दुपारपर्यंत संपर्कात नव्हते, त्यांनाही संपर्क झाला असून त्यांना वेळेत परत आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि ते वेळेत परततील.
मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी सुट्टया पडलेल्या असतील, त्या घरामध्ये आणून ठेवा किंवा जिथल्या तिथे व्यवस्थित बांधून ठेवा की जेणेकरून त्या वाराच्या प्रभावाने उडणार नाहीत आणि कोणाला इजा करणार नाही, कुठे धोका होणार नाही.
वादळ म्हटल्यानंतर पाऊस आलाच. मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होऊ नये पण भरपूर पाऊस पडल्यानंतर कदाचित आपल्याला काही ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करावा लागेल. जिथे आवश्यक नसेल तिथे विजेचे उपकरणं वापरू नका.
कोरोनाच संकट आहेच. एकामागून एक संकट येत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाही आहे. या परीक्षेमध्ये ताकदीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर पडायचं आहे. मी आपल्याला विनंती करतोय, आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्या एकत्रित पिशवीत ठेऊन पटकन हाताला लागतील अशा पद्धतीने ठेऊन द्या.
मी काही सूचना आपल्याला वाचून दाखवतो:
घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरामध्ये हलवा.
महत्वाचे दस्तऐवज किंवा मौल्यवान गोष्टी एकत्रित करून ठेवा.
बॅटरी वर चालणारी उपकरणे,पॉवरबँक चार्ज करून ठेवा.
दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या. अफवा पसरवू नका.
स्थानिक प्रशासन ज्या गोष्टी सांगेल त्यांना सहकार्य करा.
तात्पुरत्या शेडमध्ये आश्रयाला जाऊ नका.
प्रशासनाने ठरवून दिलेल्या व निश्चित केलेल्या जागा आहेत तिथेच स्थलांतरित व्हा.
आपत्कालामध्ये न लागणाऱ्या सर्व उपकरणांचा विद्युत पुरवठा खंडित करा.
पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा.
BKC मध्ये आपण फील्ड हॉस्पिटल तयार केलं आहे. काल या वादळाचा इशारा आल्यावर आपण तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवले आहे. आपण उभी केलेली शेड वॉटरप्रूफ आहे पण पावसासोबत वादळ आलं, काही पडझड झाली तर पडलेल्या शेड बांधता येतील पण मला कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा नाही होऊ द्यायची आहे.
वादळ धडकल्यानंतर पुढे भूप्रदेशात कसं जाईल, त्याची दिशा आपल्याला समजत जाईल तसं शासनाकडून आपल्याला सूचना येत राहतील. शासनाकडून वेळोवेळी दूरदर्शन, रेडिओ, एसएमएस वरून आपल्याला सूचना येत राहतील. कुठेही घाबरून वेडंवाकडं पाऊल टाकू नका.
आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसच या संकटात सुद्धा आपण सहकार्य करा. मी पुन्हा एकदा आपल्या हिंमतीला, धैर्याला, जिद्दीला मानाचा मुजरा करतो. संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे. या संकटाला धैर्याने सामोरे जाऊया या आणि त्यातून सही सलामत बाहेर पडूया!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
