#Thread
#भाग२
*सत्यशोधकी विचारांची वृत्तपत्रे*
एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशावर्गातील उच्चशिक्षितांनी सुरु केलेली होती.
ती शुद्रातिशुद्रांचे खरे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, असा महात्मा फुले यांचा आक्षेप होता. 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार' या सारख्या वृत्तपत्रांनी महात्मा फुले व सत्यशोधक मताचा विचार आणि कार्याचा विपर्यास करून निंदामूलक व गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक
समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्रक असावे असे सत्यशोधक मंडळीना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी ध्येयवादाने प्रेरीत होऊन दिनांक १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे सत्यशोधक चळवळीचे पहिले नियतकालिक सुरु केले.
त्यामुळे बहुजन समाजाच्या ध्येयवादी, प्रबोधनपर, समाजनिष्ठ पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेव बिर्जे, तान्हुबाई बिर्जे यांनी 'दीनबंधू चे संपादक म्हणून कार्य केले. 'सत्सार', 'दीनबंधू', 'दीनमित्र', 'राघव भूषण', 'मराठा दीनबंधु',
'जागरूक', 'जागृती', 'डेक्कन रयत', 'विजयी मराठा', 'भगवा झेंडा', 'तरूण मराठा', 'राष्ट्रवीर', 'प्रबोधन', 'संजीवन', 'सिंध मराठा', 'हंटर', 'मजूर', 'कर्मवीर', 'नवयुग', 'सत्यवादी', 'ब्राम्हणेतर', 'कैवारी', वगैरे प्रमुख नियतकालीके सुरु झाली. मराठी भाषिकांच्या सर्व भागापर्यंत ती पोहचत
होती. 'जागृती' हे साप्ताहिक बडोदयाहून तर 'सिंध मराठा' हे कराचीहून प्रसिध्द होत होते.
सत्यशोधक चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी पुरूष पत्रकारांप्रमाणे स्त्री पत्रकारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. म्हणूनच'तानुबाई बिर्जें हया भारतातील पहिल्या सत्यशोधक महिला संपादक बनू शकल्या.
सत्यशोधक समाजाचे कार्य अलौकिक आहे. सत्यशोधक समाजाच्या कार्याविषयी 'ज्ञानोदय' मध्ये एक वाचक लिहीतो की, 'ज्ञानोदय होऊलागल्यामुळे मतलबी ग्रंथकारांचा लोप होऊ लागला आहे. आपले हक्क कोणते, परस्परांनी कोणत्या नात्याने वागावे, चांगले काय, वाईट काय, हे लोकांना कळू लागले आहे.
असे जे काम करतात ते त्यांपैकीच सत्यशोधक समाज होय. महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक विकासामध्ये सत्यशोधक चळवळीने परिवर्तनवादी कार्य केले. सर्वसामान्य जनतेत आज जो उत्साह, स्वावलंबनाची आवड, आत्मविश्वास, विवेकजागृती, गुलामगिरीचा तिटकारा आणि शिक्षणाविषयीची
तळमळ वैगरे गुण थोडया फार प्रमाणात चमकू लागले, आहेत ते केवळ या समाजाच्या चळवळीने केलेल्या कार्याचे आणि प्रयत्नांचे फळ आहे.
महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्वही असेच महान व सर्वस्पर्शी होते. गेल्या दोन दशकामध्ये पिळवणूक, दडपशाही, प्रदूषण व दुष्काळ इत्यादी विरूध्द नव्या चळवळी
उभ्या राहिल्या. नव्या संदर्भात नव्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या चळवळी उभ्या राहिल्या. अशा काळात महात्मा जोतीराव फुले यांचा विचार व त्यांचे कार्य याचे मूल्यमापन होणे फार महत्त्वाचे आहे. त्यांनी शंभर वर्षापूर्वी दडपलेल्या जातीचे शोषण, स्त्रियांची गुलामगिरी, शेती,
पर्यावरणाचा प्रश्न, शेतकऱ्यांची लूट व शिक्षण याविषयी नवे मूलभूत विचार मांडले. दुसऱ्यावर विश्वास न टाकता, मध्यस्थांची गरज न बाळगता, स्वावलंबनाने व आत्मपरीक्षणाने स्वतःचा आणि समाजसेवेच्या रूपाने इतर बंधूभगिनींचा उध्दार करावा ही शिकवण आजही प्रेरणादायी आहे.
वरील माहिती "सत्यशोधक चळवळीचा परिक्षणात्मक आढावा मधून घेतलेली आहे.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
