*महाभारतातील सुरस कथा*
*कच- देवयानी*
कच हा देवगुरू बृहस्पतिंचा पुत्र.संजीवनी विद्या शिकण्यासाठी दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेला.त्यांना आपल्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं( गुरूंपासून कधीही काहीही लपवू नये कर्णासारखं). शिष्यभाव पत्करून आलेल्यास विद्यादान करणं हे गुरूंचं कर्तव्य
असल्यामुळे शत्रुपक्षाचा असूनही शुक्राचार्य तयार झाले. "तुला वर्षभर येथे राहावे लागेल" असे त्यांनी त्यास सांगितले. तो राहू लागला.त्याचे शिक्षण सुरू झाले. तो स्वर्गातून आला होता, संगीत विद्येत निपुण होता. शुक्राचार्य म्हणाले,"माझी पुत्री देवयानी हिला तू संगीत शिकव". तो तिला संगीत
शिकवू लागला. ती त्याच्यावर भाळली, प्रेम करू लागली. त्याला गोसेवेचेही काम गुरूंनी दिले होते. तो रोज जंगलात गायी चरायला नेत असे. आपल्या शत्रूला आपल्या गुरूंनी संजीवनी विद्या शिकवावी ही बाब दैत्यांना रुचली नाही.तो एकदा गायी घेऊन जंगलात गेला असता दैत्यांनी त्याला मारून टाकले
संध्याकाळी फक्त गायी आश्रमात परतल्या तेव्हा देवयानी वडिलांना म्हणाली की त्याचं नक्कीच काही बरे वाईट झाले असावे. तुम्ही संजीवनी विद्येचा प्रयोग करा. त्यांनी तिथूनच संजीवनी विद्येचा प्रयोग करून त्याला जिवंत केले. काही वेळाने तो घरी परतला.
काही काळानंतर त्याला दैत्यांनी पुन्हा मारून
टाकले व त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले. वन्य श्वापदांनी ते खाऊन टाकले. तेव्हा पुन्हा शुक्राचार्यांनी संजीवनी प्रयोग केला.तेव्हा त्याच्या शरीराचे तुकडे त्या श्वापदांचे उदर फोडून बाहेर येऊन एकत्र होऊन तो जिवंत झाला.तिसऱ्यांदा मात्र त्या दैत्यांनी त्याला मारले तेव्हा
त्याचे शरीर जाळून टाकले.ती राख मदिरेत मिसळून खुद्द शुक्राचार्यांनाच पाजली. नंतर जेव्हा शुक्राचार्यांना ते कळले तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटले.तेव्हा देवयानी म्हणाली की तुम्ही संजीवनी विद्येचा प्रयोग करा. कचाला तुम्ही ती विद्या दिलीच आहे फक्त ती वापरण्यास तुमची अनुज्ञा देणे
एव्हढेच राहिले आहे तर तुमच्यावतीने ती मी त्याला देईन.तो तुम्हाला संजीवनी विद्येचा प्रयोग करून परत जिवंत करेल. त्यांना ते पटले. त्यांनी तसे करताच त्यांचे उदर फोडून तो बाहेर आला. आपल्या जवळील विद्येने त्याने गुरूंना जिवंत केले. शुक्राचार्य त्यास म्हणाले की तू इथे ज्यासाठी आला होतास
ते झाले आहे.आता इथे राहणं तुझ्यासाठी धोकादायक आहे तर तू आता परत स्वर्गात जावेस हेच योग्य.
तो निघाला तेव्हा देवयानीने त्याला आपल्या त्याच्यावरील प्रेमाबद्दल सांगितले व लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.त्याने नकार दिला.एकतर ती गुरूंची पुत्री होती शिवाय तो शुक्राचार्यांच्या उदरातून
बाहेर आल्यामुळे एका अर्थी ती त्याची " सहोदरी" ( बहीण)होती. तिने संतापून त्यास शाप दिला की त्याची विद्या व्यर्थ जाईल. त्यानेही तिला शाप दिला की तिला ब्राह्मण पती मिळणार नाही.
शुक्राचार्यांनी त्यास "तू ती विद्या तुझ्या एखाद्या शिष्यास दे व मग तो त्याचा उपयोग करू शकेल" असा आशीर्वाद
दिला. तो निघून गेला.
पुढे देवयानीचा विवाह ययातीशी झाला जो कुरुवंशाचा आदि पुरुष मानल्या जातो.
त्याचा पुत्र यदु यापासून पुढे "यादव" वंश सुरू झाला, ज्यात श्रीकृष्णाचा अवतार झाला व कनिष्ठ पुत्र पुरूच्या वंशात "कुरू" झाला ज्याच्या नावाने पुढे तो वंश "कुरुवंश" म्हणून प्रसिद्ध झाला.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
