#मराठीट्विट Profile picture
#म #मराठी #रिम #मराठीट्विट #काजळराती #राजकीय #पटलंतरघ्या #माझाक्लिक #कपोलकल्पित #आजचीम्हण #अराजकीय #उपरोधिक #पाटीमराठीतचहवी #मराठीस्वाक्षरी

Jan 25, 2022, 10 tweets

२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

१. मतदान केलेच पाहिजे! हक्काचे हजार-दोन हजार मिळतात मताचे ते घ्यावे आणि मज्जा करावी. शक्यतो देईल त्या सर्वांकडून पैसे घ्यावेत आणि मतदान नोटा ला करून यावे. बोटाला शाई लागली तर सांगायला बरं पडतं की मीपण मतदान केलं!सुजाण नागरिक समजलं जातं! (१/१०)

२. मतदानाच्या दिवशी 'फुकटात मिळालेली दारू, मतासाठीचे पैसे आणि ते खर्च करण्यासाठी सरकारी सुट्टी' म्हणजे त्रिवेणी संगम असून वारंवार निवडणुका याव्यात यासाठी प्रार्थना करावी! कोणतीच निवडणूक चुकवू नये, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे! (२/१०)

३. शक्यतो कमी मतदार असलेली निवडणूक असेल, दोन्ही बाजूंकडून पैसे दारू मिळालं असेल आणि आपल्यावर संशय येऊ नये असे वाटतं असेल तर 'नोटा' ला मतदान करून यावे, दोघांनाही फसवल्याचा आनंद खूप मोठा असतो आणि आपला 'ना फायदा ना तोटा' म्हणजे सगळेच आनंदी! (३/१०)

४. खास ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत निवडणुकीत मताचा भाव गगनाला भिडलेला असतो, संधीच सोनं करून घ्यावे कारण ५००० ते १०००० एका दिवसात कमावणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, दारूच्या नशेत असला तरी पैसे मात्र मोजून घ्यावेत! परगावाहून येत असला तर तिकिटाचे पैसे वेगळे घ्यावेत! (४/१०)

५. आपला जवळचा तरुण होतकरू सुशिक्षित निवडणुकीला उभा राहिला असेल आणि गावाचं भलं होणार/करणार असेल तरीसुद्धा पैसे दिले नाहीत तर मत देऊ नये! पुन्हा ५ वर्षे तो फिरकेल याची शाश्वता नाही,आणि निवडून येईल याची तर अजिबात नाही, त्यामुळे असला नाद करून पैसे बुडवू नयेत! (५/१०)

६. मतदार 'राजा' आहे, 'प्रधान' आहे अश्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये! तुम्ही पैसे नाही घेतले तरी दुसरा घेणारचं आहे, तुम्ही मत नाही दिलं तर नुकसान तुमचंच आहे! लक्षात ठेवा, हुशार/विचारवंत ला पण एकच मत आणि बेवड्यालाही एकच मत असतंय लोकशाहीत! त्याची किंमत जाणा. (६/१०)

७. दोन्हीकडून पैसे घेऊन आणि नोटा दाबूनही मार खाण्याची परिस्थिती दिसत असेल तर २-४ दिवस परगावी जावे! निवडणुकीचा निकाल लागल्यावरच गावी यावे! उमेदवारांची नंतर गाठभेट घेऊच नये शक्यतो! (७/१०)

८. गावाचं, राज्याचं किंवा देशाचं भलं करण्याची जबाबदारी फक्त राजकारणी लोकांची आहे, जर त्यांच्याच्याने काय होत नसेल तर आपण तरी काय करणार? आणि निवडणुकीनंतर ५ वर्षे न चुकता त्यांच्या नावाने बोंब मारावी! पैसे घेतलेले मतासाठी हे विसरून जावं! सुजाण नागरिक म्हणून हे नक्की करावं! (८/१०)

९. रस्ते, वीज, महागाई, सरकारी सुविधा असल्या गोष्टी फक्त जाहीरनाम्यात लिहण्यासाठी असतात, त्याचा मनावर जास्त ताण घेऊ नये, नंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याचा काही कुणी विषय काढत नाही! पक्ष, विचारधारा, उमेदवार, त्याचे गुन्हेगारी पार्शवभूमी इ. मुद्दे दुर्लक्षित करावे. (९/१०)

१०. हे सर्व मुद्दे विचारात घेतल्याशिवाय मतदान करू नये, राजकारणात कोण कुणाचं नसतं, हे सूत्र मनात घट्ट बाळगून ठेवावं! युत्या-आघाड्या होतील, बिघडतील कोण कुणासोबत जाईल याची काळजी करू नये! आपल्या मतांमुळे हे शक्य होतेय याचा अभिमान बाळगावा!
#उपरोधिक #राजकीय (१०/१०)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling