रात्री मुंबई झोपत नाही हे खरं असल्याची जाणीव मेधाला इथे आल्यानंतरच्या 2-3 दिवसातच झाली होती. चिकमगळूर जवळच्या तिच्या छोट्याशा गावात 7 वाजताच शुकशुकाट व्हायचा. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा ती नोकरीसाठी मुंबईत आली तेव्हा या शहराच्या झगमगाटाने तिचे डोळे दिपून गेले होते.
आता मात्र हे सगळं सवयीचं झालं होतं. रात्री बेरात्री फेरफटका मारायला जाताना आपण अगदी एकटे नसल्याची जाणीव तिला सुखावणारी होती. सतत बहीण भावांच्या गराड्यात असलेल्या तिला एकटेपण खायला उठत असे.
आज पण असंच ऑफिसमधून निघायला रात्रीचे बारा वाजले तरी आजूबाजूला माणसं बघून तिला जरा बरं वाटलं. तिने रिक्षा पकडायला हात वर केलाच तेवढ्यात तिची नजर एका आजीवर पडली. हातात औषधांची पिशवी घेऊन आजी रस्त्याकडे थरथरत्या नजरेने बघत होती. बहुतेक आजींना रस्ता ओलांडता येत नसावा.
मेधाला त्यांना बघून तिची आई आठवली. तिने पटकन पुढे जाऊन विचारलं "आजी, काही मदत करू का?". आजीने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाल्या "मला रस्ता ओलांडायला मदत करशील?" "नक्कीच" मेधा म्हणाली आणि तिने आजीचा हात हातात घेतला.
"आजी, तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय?" मेधाने विचारलं. "अगं औषध आणायचं राहिलं होतं. तेच आणायला आले होते." आजी म्हणाल्या. "अहो. मग दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना आजी! उगाच तुम्हाला त्रास!" मेधा म्हणाली.
"अगं दुसरं आहे कोण मला? मुलगा आणि सून परदेशात. आणि आमचे हे तर मागच्या वर्षीच मला सोडून गेले..." बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. मेधालाही खूप वाईट वाटलं. एव्हाना रस्ता ओलांडून झाला होता. "चला आजी. तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडते" मेधा म्हणाली.
आजी हसली आणि म्हणाली "खूप गुणाची आहेस गं मुली. देव तुझं भलं करो." आजीची बिल्डिंग आली. "चहा घ्यायला वर येतेस का पोरी?" आजीने विचारलं. "नको आजी. उशीर झालाय. पुन्हा कधीतरी येईन" असं म्हणून मेधा जायला निघाली. तेवढ्यात सोसायटीच्या वॉचमनने तिला पाहिलं आणि विचारलं "मॅडम, काय काम आहे?"
"अहो, मी ह्या आजींना सोडायला आले होते." मेधा म्हणाली. "कुठल्या आजी? इथे तर कोणीच नाहीये" वॉचमन म्हणाला. मेधाने चमकून मागे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. "अरे पण मघाशी त्या आजी... त्या होत्या ना... गोऱ्याशा, घारे डोळेवाल्या" मेधा बावरून म्हणाली.
वॉचमनने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाला "अहो मॅडम. त्या आजी 5 वर्षांपूर्वीच वारल्या. एकट्या राहायच्या त्या. औषध आणायला म्हणून समोरच्या केमिस्टकडे गेल्या आणि एका गाडीने उडवलं त्यांना!" #भुतांच्या_गोष्टी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh