पुस्तक - प्रतिपश्चंद्र
लेखक - डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 440
किंमत रुपये - 390₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा - उत्तम
पुस्तक समीक्षण:
कादंबरी ची सुरुवात 2016 मध्ये म्हणजेच 21व्या शतकात होते आणि पुढे आपण 14 व्या आणि 16 व्या शतकांची सफर ह्या कादंबरीतून करतो. या तीनही शतकांचा मेळ उत्तम रीतीने लेखकाने साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे
पण त्या आधीची भारताची परिस्थिती यातून आपल्याला दिसते. बहामनी आक्रमणानंतर विजयनगरचे साम्राज्य लयाला गेले, परंतु त्या आधी विजयनगर ची अफाट संपत्ती एका रात्रीत गायब झाली होती. ती नक्की कुठे गेली? कोणालाच माहीत नाही. खूप शोध घेऊन ही तिचा काही पत्ता लागला नाही.
याबद्दल सामान्य लोकांच्या मनात बरेच समज गैरसमज निर्माण झाले. वर्षानुवर्षे या संपत्ती च शोध न लागल्यामुळे ती लोकांच्या विस्मरणात गेली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत गेले असताना स्वतः विजयनगर साम्राज्याचे राजगुरू महाराजांच्या भेटीसाठी येतात
त्यांना गुप्त खजिन्याची सर्व माहिती देतात व त्या खजिन्याचा उत्तराधिकारी होण्याची विनवणी करतात. मात्र महाराज त्या खजिन्याचा उत्तराधिकारी होण्यापेक्षा त्या खजिन्याचा रक्षक होण्याची जबाबदारी घेतात.
पुढे महाराज खजिन्याचे रक्षण करण्यासाठी शिलेदार नेमतात व खजिन्याच्या रक्षणाची योजना आखतात. प्रतिपश्चंद्र ही कादंबरी याच खजिन्याच्या शोधाची आजच्या काळातील कथा ह्या कादंबरीत आहे.
भारताचा भव्यदिव्य असा इतिहास प्रत्येक पानावर इथं भेटतो. कादंबरीतील प्रत्येक पात्र त्याची स्वतःची अशी छाप मनावर सोडून जात. एकूण अप्रतिम आणि उत्कृष्ट दर्जाची रहस्य कादंबरी आपल्याला वाचायला आणि अनुभवायला मिळेल.
पुस्तक समीक्षण - #मार्मिक