जागतिक महिला दिनादिवशी एखाद्या विरांगनेची कहाणी वाचल्यावर एक स्त्री असल्याचा जाज्वल्य अभिमान वाटतो, अशीच एक कहाणी जी प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्रीत्वाचा अभिमान जागृत करते त्या म्हणजे ' राणी अबक्का चौटा '. मंगलोर जवळील उल्लाल या भागाची राणी म्हणजे 'राणी अबक्का'.
१६ व्या शतकात मोठ्या शर्तीने या राणीने पोर्तुगिजांचा सामना केला.
समुद्र आणि समुद्र किनाऱ्यावरील सर्व भागावर १५ व्या शतकापासून पोर्तुगीजांचे अधिराज्य होते आणि त्यांनी सगळे व्यापारी मार्ग स्वतःच्या ताब्यात घेतले होते. कोणीही त्या मार्गांवरून जात असेल तर
त्यांच्याकडून अवाच्या सव्वा कर वसूल करून घेऊन व्यापाराचा मणका मोडायचे काम ते करत असत.
मंगलोर हे राज्य समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे या राज्याच्या सैन्याकडे थोड्याफार प्रमाणात नौदल होते परंतु पोर्तुगिजांचा सामना करता येईल एवढे नाही. एक एक करत ते त्यांचे साम्राज्य वाढवत चालले होते
आणि १५२६ मध्ये ऍडमिरल लोपो वाझ डे सम्पाइओ याने मंगलोर काबीज केले. त्या वेळेला इथे राज्य होते तिरुमला राय III यांचे.अनेक वर्ष हे राज्य त्यांच्या ताब्यात राहिले. १५४४ च्या दरम्यान राणी अबक्का तिथली राणी झाल्या आणि त्यांनी कर देण्यास नकार दिला.
अनेक वर्षांच्या राज्यामध्ये पोर्तुगीजांना असेल पहिल्यांदाच सहन करावे लागले. राणी अबक्का कोणत्याही परिस्थिती त्यांच्यासमोर झुकायला तयार नव्हत्या,असे करत अनेक वर्ष त्यांनी स्वतःचे सैन्य निर्माण केले. आणि शेवटी त्यांची वाढती ताकद पाहून १५५५ मध्ये पोर्तुगीजांनी
डॉन अल्वारो डा सिल्व्हयर याला त्यांच्या विरोधात लढावयास पाठवले. राणीने मोठ्या शर्तीने लढाई केली परंतु संपूर्ण विजय प्राप्त करता आला नाही. पोर्तुगीज या लढाईने हादरले मात्र हे नक्की. १५६५ मध्ये त्यांनी नजीकच्या साम्राज्यांशी तह करून पोर्तुगीजांच्या विरोधात अजून मोठे सैन्य उभे केले.
आणि मंगलोर जिंकण्याचा प्रयत्न केला. थोडे यश मिळाले पण नशिबाने घात केला,त्यांच्या नवऱ्यानेच त्यांना दगा दिला.तरी राणी हरल्या नाही, १५७० मध्ये पुन्हा एकदा राणी उभ्या राहिल्या, पुन्हा एकदा लढाई केली आणि अशी लढाई केली ज्याने पोर्तुगीज संपूर्ण पणे हादरले,
एक बलाढ्य साम्राज्य काही काळाकरता शांत झाले.परंतु राणी अबक्कानां संपूर्ण जय कधीही मिळाला नाही.शेवटी त्यांना त्यांच्याच लोकांनी अटक केली, तरीही अटकेत राहून सुद्धा पोर्तुगीज आणि विदेशी विरोधात बंड पुकारले आणि त्यांनी शेवटचा श्वास देखील या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी घेतला.
अशा स्त्रियांची कहाणी ऐकल्यावर खरंच ऊर्जा मिळते आणि आपण सुद्धा या भारतभूमीसाठी काहीतरी करावे असे वाटते
महिलादिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!