हे स्थान सांगलीच्या जत तालुक्याच्या मुख्यालयापासून उत्तरेकडे १० कि. मी. वर वसले आहे.
फार पूर्वी शेगाव, वाळेखिंडी, बनाळी येथील काही भाविक बदामी (कर्नाटक) येथे नित्यनियमाने बनशंकरीच्या दर्शनाला चालत जात असत. लाखो भाविकांचे
श्रद्धास्थान असलेले बनशंकरीचे मूळ देवस्थान बदामी, कर्नाटक येथे आहे. त्यावेळीचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांची देवीवर अतूट भक्ती असल्यामुळे ते सर्व त्रास सहन करून दर्शनाला जात असत. वयोमानामुळे त्यांना मर्यादा येऊ लागल्या. आता आपण शेवटचे दर्शन घ्यायचे म्हणून तिघेजण बदामीला आले.
त्यांनी देवीचे दर्शन घेऊन तिला आपल्या मनातील कामना सांगितल्या. आता आपण हे शेवटचे दर्शन घेऊन जात आहोत, असे देवीस विनवले. त्यावर प्रसन्न होऊन देवीने त्यांना सांगितले की, "मीच तुमच्या बरोबर येत आहे. फक्त तुम्ही मागे वळून पाहू नका."
हे ऐकून ते आनंदाने परतीच्या प्रवासाला लागले.
गावाजवळ येताच ते देवीचे वचन विसरले. देवी आली की नाही हे पाहण्यासाठी न राहून मागे पाहिले असता देवी तिथेच अदृश्य झाली. त्यांनी देवीची खूप विनवणी केली. देवीने तिथेच आपली स्थापना करावयास सांगितले. ही बातमी गावक-यांना समजताच त्यांनी तिथे देवीची स्थापना केली व मंदिर उभारले. देवीची
नित्यपूजा चालू झाली.
मंदिर परिसर घनदाट झाडांनी भरलेला आहे. जत तालुक्यात वैराण माळरान असताना मंदिर परिसरात गर्द वनराई आहे. चारी बाजूला छोट्या टेकड्या व मधोमध असणाऱ्या दऱ्यांमध्ये वृक्षांची गर्दी आहे. ही तर त्या आईचीच कृपा! बाजूलाच मोठी विहीर पाहावयास मिळते. त्याच परिसरात अजून
एक विहीर आहे. एकीने गावाला तर दुसरीने मंदिर आणि मंदिर परिसरातील झाडांना पाणीपुरवठा होतो. बरेच पक्षी या ठिकाणी वास्तव्याला आहेत.
बनाळी गाव हे संपूर्ण शाकाहारी आहे. कोणी मांसाहार केला तर जंगलातील मधमाश्या हल्ला करतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. गावात मांसाहार पूरक कोणताही
व्यवसाय केला जात नाही.
येथे पौष व आश्विन महिन्यात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. सणासाठी देवीची विशेष पूजा होते. दुर्गाष्टमी मुख्यदिवशी आईची पालखी मंदिराभोवती फेऱ्या घालून गावाभोवती फेरी घालतात. येथे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक
हजेरी लावतात.
जवळची मंदिरे: पंढरपूर (७५-८० कि.मी.)
मार्ग: पुणे - मुंबई बाजूने जायचे असल्यास सोलापूर हायवे मार्गे, टेंभूर्णी-पंढरपूर-सांगोला हा रस्ता उत्तम आहे.