विजय गिते-पाटील Profile picture
#संतांचा_शुरांचा_महापुरुषांचा_महाराष्ट्र

Aug 15, 2022, 24 tweets

#Thread #स्वातंत्र्यदिन
गांधींचे राष्ट्रीय ऐक्य -

देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇

स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!

कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?

ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.

हिंसेने आंदोलन करून स्वराज्य भेटेल का माहीत नाही पण यात जनतेची अपरिमित हानी होईल हे गांधींनी चाणाक्षपणे ओळखले. स्वातंत्र्यासाठी लोकांना इंग्रजी गोळीची शिकार का होऊ द्यावे, त्याना जीवनाच मूल्य ठाऊक होते. गांधीजीचा स्वातंत्र्यमार्ग कठीण असला तरी तो जनेतला हितकारक होता..!!

बर..! हिंसेने स्वातंत्र्य मिळत असेल तर लोकांनी इंग्रजांची गुलामगिरी का उलथवून टाकली नाही? इंग्रज होते तरी किती ? 30 -35 कोटी भारतीय आणि समोर दोन लाख इंग्रज, मग का बर नाही झाला शस्रउठाव ? याच उत्तर द्याल का कोणी ? उठसूट गांधींच्या अहिंसेवर अकारण बरळणारे आपण हा विचार करतो का ?

परदेशी व्यापारी म्हणून आलेले इंग्रज साम्राज्यावादी होऊन आपल्या उरावर कठोर सत्तेचा वरवंटा फिरवत होते ते कशाच्या जोरावर ? ते म्हणजे आपल्या नेभळटपणाच्या जोरावर. दगलबाज इंग्रजानी इथल्या जनतेची सर्व पोथी जाणली, भारतीय समाज अशिक्षित, त्यात धार्मिक फूट पाडून ऐक्य बिघडवून आपले काम सोपे.

१८५७ चा उठाव का फसला याची मीमांसा अनेक जाणकार लोकं करतात. १८५७ उठाव हा नक्कीच प्रेरणादायी होता, पण त्यात कुठेही लोकशाहीचा लवलेशही नव्हता. हा समरसंग्राम होता आपली वतन वाचवण्याचा, आपली राज्ये परदेशी लोकांच्या घशातून वाचवण्याचा. पण तो उठाव आपण हरलो अस मी म्हणणार नाही. तो फसला होता.

त्या उठावात बहुतांश फक्त सेना होती. त्यात शेतकरी, मजूर, सामान्य नागरिक नव्हते.
हाच फरक मला दिसतोय १८५७ चा रणसंग्राम आणि १९४२ चले जाव स्वातंत्र्यसंग्रामात.

गांधीजीनी इथून मागचे उठाव, आंदोलन, नेतृत्व याचा शोधाभ्यास केला, त्यामधे त्याना अनेक चांगल्या बाबी व उणिवा दिसल्या.

त्यानी टिळकांची स्वदेशी चळवळ, बहिष्कार, हे काय बंद नाही केलं, फक्त त्यानी त्या सर्व तत्वांचा आशय बदलला, त्याला अधिक व्यापक रूप दिल. इथून मागे झालेल्या चांगल्या योजना त्यानी अधिक तीव्रतेने व नवीन शैलीने चालवल्या. यात गांधींजीचं उदारमतवादी धोरण, दिलदारपणा मला ठळकपणे जाणवतो.

कुठलाही पुढारी अध्यक्षपदी आला की इथून मागच्या कल्पना-योजना बंद करतो. मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, हे सर्व उदयास येत अहंकार भावनेतुन. मात्र गांधीजीकडे अहंकाराला किंचीतही जागा नव्हती, ते चांगल्या बाबी खुल्या मनाने स्वीकारत व वाईट बाबी मोठ्या खुबीने आणि अलगदपणे त्यागत.

त्यांच्याआधी असलेल्या पुढाऱ्यांमधे असलेली उणीव त्यानी भरून काढली. काय होती ती उणीव, अन यामुळेच जग त्याना डोक्यावर घेत.

इंग्रजांच देशावर राज्य करण्याच हत्यार - लोकात फूट पाडणे. गांधीजींनी हे हेरलं आणि आणि त्यानी लोकामध्ये फिरण्यास सुरवात केली. लोक'अडचणी उमजून घेतल्या.

बापूंचा निष्कर्ष असा निघाला - देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर देशाला लढावे लागेल- ते हिंदू, मुसलमान, शीख, जैन, बौद्ध, पारसी बनून नाही. ते ब्राह्मण,राजपूत, मराठा, जाट, पाटीदार, दलित,आदिवासी बनून नाही. ते गरीब श्रीमंत बनून नाही, ते गाव-शहरी, अडाणी-सुशिक्षित बनून नाहीच नाही.

त्यासाठी आपल्याला देशबांधव म्हणुन एकत्र यावे लागेल. इंग्रजांचे मनसुबे जर कोणी विशाल प्रमाणात उधळले असतील तर ते गांधींजीनी याच राष्ट्रऐक्य शक्तीच्या जोरावर.

भारत म्हणजे एक विश्वच होय. यात इतकी विविधता आहे की निसर्गाचे रंग सुद्धा चक्कर खाऊन पडतील, एवढे सौन्दर्य आणि रंग आहेत

हे सर्व रंग एकत्र आणून त्याचा इंद्रधनुष्य व्यापारी साम्राज्यवाद्यांवर नुसता रोखून जरी धरला तरी ते भयाने गांगरून खाली पडतील.

याने आपल्याला कुठलाही शस्रउठाव करण्याची निकड भासणार नाही. पण हे काम छान वाटत असलं तरी सोपं निश्चितच नव्हत. त्यासाठी बापूना खूप मोठा यत्न करावा लागला..!

दलित बांधवाची मने आणि माना, भटभिक्षुकशाहीच्या जुलमी जोखडाने पार पिचून गेल्या होत्या. त्याना इंग्रज गेले काय आणि येऊन उरावर बसले काय अज्जिबात फिकर नव्हती, त्याना हे काय नवीन नव्हतं. परंतु गांधीबापूनी जे केलं याआधी कुणी केलं नाही. दलित बांधवाना हरीचे जन संबोधून बापूनी जवळ घेतलं.

त्याना स्वातंत्र्याची जाणीव दिली, अन ते स्वातंत्र्य चळवळीचे भागीदार झाले. तसेच शीख जैन बौद्ध धर्मीयांना सुद्धा त्यानी चळवळीत आणलं. राहिला प्रश्न मुस्लीम बांधवांचा इतर जनापेक्षा हा प्रश्न गांधींना जास्त सतावत होता.
इंग्रजांनी अशी काय फूट निर्माण केली होती की गांधीचा कस लागला तिथं.

पण गांधी हे आधुनिक भारताचे महानायक होते. आणि असे विश्वदीपक नायक संकटांना भीत नाही. गांधी आव्हानाना आव्हान देत नव्हते ते त्याना आवाहन करायचे निकट येण्याचे, अन आपल्यात सामील होण्याचे.

महात्मा बौध्दांची ही शैली त्यानी चांगलीच आत्मसात केली होती. अस मला विश्वासाने वाटतं..!

बापूंनी मुस्लिम बांधवांशी अन त्यांच्या नेत्यांशी व्यवस्थित चर्चा केल्या, प्रसंगी माघार घेतली. कारण त्याना मनोमन वाटायचे. देशाला पूर्ण स्वातंत्र्य हवे असेल तर पूर्ण देशाने यात प्राण भरला पाहिजे. हिंदू नंतर सर्वात मोठी लोकसंख्या मुसलमानांची. तीच या चळवळीपासून फटकून राहता कामा नये

१९२० ते १९४२ या दोन दशकांत त्यानी घेतलेली भीष्मप्रतिज्ञा फळाला आलीच.
सबंध देश एकसुरात गगनभेदी गर्जना करत चले जावं इंग्रज म्हणू लागला. पूर्ण जनमत हे आता जागरूक झालय. ते आज गांधीमुळे जरी शांतता मार्गाने विरोध करत असलं तरी, एकदा का जर ते पेटल कीगांधी काय ब्रम्हदेवही रोखणार नाही.

अन त्यानी आपला चंबूगबाळा, वाटी-वस्तरा, बोऱ्या-बिस्तरा गुंडाळण्यास सुरवात केली.

हे केवळ गांधीजीच करून शकत होते. अनेक जातीपाती, पाच-सहा धर्म, आर्थिक विषमता,
यावर मात करत त्यानी राष्ट्रीय ऐक्य जागवले.
भारतात लोकशाही येण्यासाठी त्यानी वहिवाट मोकळी करुन दिली हे महत्त्वाचे.

गांधीजीने राष्ट्रीय ऐक्यासाठी जे प्रयत्न केले ते इतिहासात नमुद आहेतच. त्याची पुनरावृत्ती मी जाणूनबुजून टाळली कारण. त्या घटना सांगून मी फक्त आपल्याला माहिती दिली असती.
त्यात काय हशील ? मुख्य हेच, त्यामागची सर्व परिस्थिती, भावना मांडणे मला योग्य वाटल.
आणि तेच आपल्याला उपयोगी आहे.

गांधीबापूवर मी आधीही एक लेख लिहला होता पण तो मला अपूर्ण वाटत होता आज त्यात भर टाकून त्याला पूर्णत्व देण्याचा हा प्रयत्न..

आजच्या स्वातंत्र्यदिनी देशात एकता अबाधित राहो यासाठी झटत राहू..🇮🇳🙏

लेख पूर्ण वाचल्याबद्दल आभारी आहे.
शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुकांसाठी क्षमस्व..🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling