सध्या चालू असलेल्या मंत्र्यांचे दौरे, बातम्या, व्हायरल झालेले व्हिडिओ यावरून सर्वांना लक्षात आलेलेच असेल की सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल काय झालेले आहेत. यापासून वाचण्यासाठी पीकविमा हा कार्यक्रम अतिशय गाजावाजा करून राबविला गेला.
सत्ताधारी, शेतकरी संघटना, प्रवक्ते, मीडिया यांच्याद्वारे तुफान प्रसिद्धी या कार्यक्रमाला देण्यात आली. आता पिकाला विमा भेटणार, मग शेतकऱ्यांचे सगळे नुकसान कमी होणार, बळीराजाचं राज्य येणार असले चित्र रंगवले गेले. मग यासाठी भल्या मोठ्या कंपन्यांना कंत्राटं दिली गेली.
नंतर प्रत्यक्षात पंतप्रधान फसल बिमा योजना आली, मोहीम स्वरूपात कृषी विभागाने राबविली. शेतकऱ्यांना पिकविम्याचे महत्त्व समजावून त्यांना पिकांचा विमा उतरवायला लावला. कृषी विभागाच्या थेट संपर्काने मोठ्या प्रमाणात विमा योजनेत शेतकरी सहभागी झाले.