CCBK हे जेवढं अमोल कऱ्हाडकर व गौरव जोशी ह्यांनी सुरू केलेलं मराठी क्रिकेटसाठी व्यासपीठ आहे तेवढंच ते तुम्हा क्रीडारसिकांचंही हक्काचं व्यासपीठ आहे. आपल्या परिवाराचा सदस्य पराग मोगलेने आशियातील नव्या अटीतटीच्या संघर्षाची पार्श्वभूमी शब्दबद्ध केली आहे. #म#मराठी#क्रिकेट#AsiaCup
त्यावर अभिप्राय नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे मत २० ते ५० सेकंदांच्या व्हिडिओ अथवा लेखाद्वारे व्यक्त करायचे असेल तर जरूर ई-मेल करा (barachkaahi@gmail.com). ओव्हर टू पराग @onlyforcricket0
भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणाऱ्या आशिया कप २०२२ स्पर्धेतील सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले होते.अपेक्षाप्रमाणेच हा सामना उत्कंठावर्धक राहिला. सोबतच अलीकडील काळात बांगलादेश व श्रीलंका या संघांदरम्यान एक नवी चुरस बघायला मिळत आहे.
या संघर्षाची सुरुवात झाली मार्च, २०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या सुप्रसिद्ध निदाहास ट्रॉफी ह्या श्रीलंकेतील तिरंगी स्पर्धेदरम्यान. एक प्रकारे सेमीफायनलचे स्वरूप प्राप्त झालेल्या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता होती.
यावेळी श्रीलंकन गोलंदाज ईसरू उदानाने २ शॉर्ट-पीच बॉल टाकले. बांगलादेशची मागणी होती की षटकातील दोन बाऊन्सरची मर्यादा पूर्ण झाली असून दुसऱ्या चेंडूला नो बॉल देण्यात यावे. मात्र अंपायरच्या मते दोन्ही चेंडू योग्य होते.
या प्रकरणामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन प्रचंड संतापात होता व त्याने आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर येण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर मैदानावर ड्रिंक्स देण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा राखीव खेळाडू व श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये आक्रमक संभाषण घडून आले.
अखेर काही काळानंतर नाराजी नाट्य दूर झाले व सामन्याला सुरुवात झाली. यावेळी बांगलादेशचा अनुभवी फलंदाज महमदुल्ला रियादने शेवटच्या षटकातील १२ धावांचे आव्हान पूर्ण करत बांगलादेशला थरारक विजय मिळवून दिला.
या विजयानंतर बांगलादेशी खेळाडूंनी मैदानावर केलेले नागीण नृत्य सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. बांगलादेशी खेळाडू आपल्या नृत्याद्वारे श्रीलंकन खेळाडूंना डिवचत असल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले होते.
याच प्रसंगाची आठवण मनात ठेवत नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेतील सामन्यात श्रीलंकेने रोमांचक विजय मिळवल्यांतर मैदानावर नागीण नृत्य केल्याचे दिसून आले.
कोण योग्य, कोण अयोग्य या बाबी जरी महत्त्वाच्या असल्या तरी क्रिकेट रसिकांना एक घणाघाती संघर्ष मैदानावर व मैदानाबाहेर बघायला मिळत आहे हे मात्र नक्की. खरंच भारत-पाकिस्तान ही आशियातील सर्वात अटीतटीची लढाई आहे? #SLvBAN#INDvsPAK