राजवाडीचा सोमेश्वर - कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे. वैशिष्ट्य वेगळे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली जवळ आपण शास्त्री नदी पार करतो.
तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथून संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे. तिथून पुढं राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडीरस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो.
तिथं पायऱ्या उतरून अजून पाव किलोमीटर पुढं गेले की पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीवकामाने सजलेले सोमेश्वर शिवमंदिर आपल्याला दिसते. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही.
या मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे. वरच्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी. अशी रचना अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाही. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असावी असे वाटते.
जरी गर्भगृह दगडी खांबांवर बांधलेले असले तरीही इतर ठिकाणी लाकडाचे खांब अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम या मंदिराची अजून एक खासियत आहे असे म्हणता येईल.
इथं नंदीच्या मागे ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसली. त्यावर गंध फुले कुंकू वाहून पूजनही झालेलं दिसलं. दगडी बांधकामाच्या अवशेषातील हा भाग इथं पूर्वीपासून ठेवलेला आहे. त्याला काही विशिष्ट अर्थ असल्याचे स्थानिकांना व पुरोहितांनाही सांगता आले नाही.
विविध नक्षीच्या सुंदर वेलबुट्टीचे काम तसेच लाकडात कोरलेल्या मानवी आकृती पाहताना आपल्याला हळूहळू लक्षात येतं की इथं खिळे मारून लाकडाचे तुकडे एकमेकांना जोडलेले नसून एकमेकात अडकणाऱ्या भागांना एकत्र करून ही काष्ठरचना बांधली गेली असावी.
काही कला अभ्यासक मानतात की कोकणात अनेक महत्वाची बंदरे असल्याने मोठ्या आकाराचे भक्कम ओंडके अशा कामासाठी सहज उपलब्ध झाले असावेत.मंदिराच्या भिंतींवर शरभचिन्हे कोरली असल्याने असा कयास मांडला जातो की या भागातील एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने मंदिराचे बांधकाम प्रायोजित केले असावे.
या शरभ चिन्हांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन ठिकाणी नेहमी प्रमाणे हत्ती पंजात पकडलेले दिसतात तर एका ठिकाणी कासव धरले आहे.
मंदिराला चारही बाजूंना जांभा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथं दिसते. ही दीपमाळ निदान २०-२२ फूट तरी उंच असावी. मंदिराला संरक्षण देण्यासाठी बांधलेलं चिरेबंदी बांधकाम आता ढासळू लागलेलं असलं तरीही त्याच्या मूळ भव्यतेची कल्पना आजही येते.
शरभ शिल्पांव्यतिरिक्त इथं दाराच्या चौकटीवर घोडा आहे हे एक विशेष मानता येईल. गुजरातकडील मंदिरांमध्ये अश्व शिल्प अनेकदा दिसते. पण महाराष्ट्रात प्रथमच हे पाहिले.
मंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे. याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी १९६० रोजी केला असं इथल्या नोंदीवरून कळते. पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं.
बादलीत पाणी घेतले तर गार पाण्याची भर न घालता अंघोळ करणं या ठिकाणी अशक्य आहे. स्वच्छ गरम पाण्यातून बुडबुडे येत असतात. बाजूलाच स्नानाची सोय केलेली आहे. चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना राजवाडी येथे महामार्गापासून अगदी अर्धा पाऊण किमी आत असलेले हे मंदिर जरूर पाहायला हवे असे आहे.
शास्त्री नदीवरील पूल आरवली येथे ओलांडला की लगेचच एक गरम पाण्याचे कुंड आहे. हा ब्रिटिशकालीन पूलही तिथून पाहता येतो. मग पुढं काही किमी अंतरावर महामार्गाला लागूनच एक भग्न शिवालय, नवीन केदारेश्वर मंदिर आहे आणि तिथं गरम पाण्याचे अजून एक कुंड आहे.
आणि मग २-३ किमी पुढं आपला सोमेश्वर राजवाडीचा फाटा डावीकडे येतो. या परिसरात बुरंबाडला जाऊन श्री आमयाणेश्वराचे भव्य शिवालय आणि तिथं असलेली पुष्करिणी जरूर पाहायला हवी. मावळंगे येथे योगनरसिंह मंदिर आहे तेही पाहायला हवे.
लेख आणि फोटो साभार - दर्या फिरस्ती
#कोकण #म
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.