राजवाडीचा सोमेश्वर - कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे. वैशिष्ट्य वेगळे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली जवळ आपण शास्त्री नदी पार करतो.
तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथून संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे. तिथून पुढं राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडीरस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो.
तिथं पायऱ्या उतरून अजून पाव किलोमीटर पुढं गेले की पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीवकामाने सजलेले सोमेश्वर शिवमंदिर आपल्याला दिसते. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही.
या मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे. वरच्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी. अशी रचना अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाही. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असावी असे वाटते.
जरी गर्भगृह दगडी खांबांवर बांधलेले असले तरीही इतर ठिकाणी लाकडाचे खांब अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम या मंदिराची अजून एक खासियत आहे असे म्हणता येईल.
इथं नंदीच्या मागे ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसली. त्यावर गंध फुले कुंकू वाहून पूजनही झालेलं दिसलं. दगडी बांधकामाच्या अवशेषातील हा भाग इथं पूर्वीपासून ठेवलेला आहे. त्याला काही विशिष्ट अर्थ असल्याचे स्थानिकांना व पुरोहितांनाही सांगता आले नाही.
विविध नक्षीच्या सुंदर वेलबुट्टीचे काम तसेच लाकडात कोरलेल्या मानवी आकृती पाहताना आपल्याला हळूहळू लक्षात येतं की इथं खिळे मारून लाकडाचे तुकडे एकमेकांना जोडलेले नसून एकमेकात अडकणाऱ्या भागांना एकत्र करून ही काष्ठरचना बांधली गेली असावी.
काही कला अभ्यासक मानतात की कोकणात अनेक महत्वाची बंदरे असल्याने मोठ्या आकाराचे भक्कम ओंडके अशा कामासाठी सहज उपलब्ध झाले असावेत.मंदिराच्या भिंतींवर शरभचिन्हे कोरली असल्याने असा कयास मांडला जातो की या भागातील एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने मंदिराचे बांधकाम प्रायोजित केले असावे.
या शरभ चिन्हांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन ठिकाणी नेहमी प्रमाणे हत्ती पंजात पकडलेले दिसतात तर एका ठिकाणी कासव धरले आहे.
मंदिराला चारही बाजूंना जांभा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथं दिसते. ही दीपमाळ निदान २०-२२ फूट तरी उंच असावी. मंदिराला संरक्षण देण्यासाठी बांधलेलं चिरेबंदी बांधकाम आता ढासळू लागलेलं असलं तरीही त्याच्या मूळ भव्यतेची कल्पना आजही येते.
शरभ शिल्पांव्यतिरिक्त इथं दाराच्या चौकटीवर घोडा आहे हे एक विशेष मानता येईल. गुजरातकडील मंदिरांमध्ये अश्व शिल्प अनेकदा दिसते. पण महाराष्ट्रात प्रथमच हे पाहिले.
मंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे. याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी १९६० रोजी केला असं इथल्या नोंदीवरून कळते. पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं.
बादलीत पाणी घेतले तर गार पाण्याची भर न घालता अंघोळ करणं या ठिकाणी अशक्य आहे. स्वच्छ गरम पाण्यातून बुडबुडे येत असतात. बाजूलाच स्नानाची सोय केलेली आहे. चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना राजवाडी येथे महामार्गापासून अगदी अर्धा पाऊण किमी आत असलेले हे मंदिर जरूर पाहायला हवे असे आहे.
शास्त्री नदीवरील पूल आरवली येथे ओलांडला की लगेचच एक गरम पाण्याचे कुंड आहे. हा ब्रिटिशकालीन पूलही तिथून पाहता येतो. मग पुढं काही किमी अंतरावर महामार्गाला लागूनच एक भग्न शिवालय, नवीन केदारेश्वर मंदिर आहे आणि तिथं गरम पाण्याचे अजून एक कुंड आहे.
आणि मग २-३ किमी पुढं आपला सोमेश्वर राजवाडीचा फाटा डावीकडे येतो. या परिसरात बुरंबाडला जाऊन श्री आमयाणेश्वराचे भव्य शिवालय आणि तिथं असलेली पुष्करिणी जरूर पाहायला हवी. मावळंगे येथे योगनरसिंह मंदिर आहे तेही पाहायला हवे.
लेख आणि फोटो साभार - दर्या फिरस्ती #कोकण#म
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे : रेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत.कोणता किनारा जास्त चांगला हे ठरवणं खरंच खूप कठीण आहे.
आणि प्रत्येक समुद्र रसिकाला विचारलं तर प्रत्येकाचं मतही वेगळं असणारच. त्यामुळे कोणतेही रँकिंग करणं म्हणजे वादाला आमंत्रण देणं. तरीही कोकण प्रवासात चुकवू नयेत असे सगळ्यात भारी 50 किनारे कोणते..?? तर चला दाखवतो..
आवास बीच - मुंबईपासून फार दूर नसलेल्या या गावातील समुद्रावर फेरफटका मारण्याचा अनुभव निराळाच. इथं जवळच सासवणेला करमरकर शिल्प संग्रहालयही पाहता येते.
केळशीचा याकूब बाबा दर्गा - कोकणातील एक महत्त्वाचे मुस्लिम पीराचे स्थान म्हणजे केळशीच्या जवळ उटंबर टेकडीवर असलेला याकूतबाबा दर्गा. सिंध मधील हैदराबादहून हे बाबा १६१८ साली बाणकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितलं जाते.
त्यांच्याबरोबरच सोबत सोलीस खान नावाचा एक युवकही आला होता. स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडीभाडे भरले आणि पुढे त्याचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते.
हा ३८६ वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा या नावाने ओळखला जातो. दरवर्षी ६ डिसेंबरच्या दिवशी इथं उरूस भरतो ज्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू व इतर धर्मांचे भाविकही येत असतात.
तवसाळचा विजयगड : शास्त्री नदीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला तर बहुसंख्य कोकणप्रेमींना माहिती आहेच. पण याचा जोड किल्ला सुद्धा आहे. तवसाळ येथे असलेला विजयगड. शास्त्री नदीच्या मुखाच्या उत्तरेला तवसाळ किनाऱ्यावर खडा पहारा देणारा हा दुर्ग.
आज मात्र आपण या किल्ल्याचे अवशेषच पाहू शकतो. हे अवशेष सागरी महामार्गावरच आहेत पण पटकन दिसत नाहीत. जयगड ते तवसाळ फेरी पकडून आपण गुहागरच्या दिशेने सहज जाऊ शकतो. तवसाळ जेट्टीहून निघाले की डाव्या बाजूला तवसाळचा समुद्र किनारा आहे.
हा टप्पा पार झाला की चढण येते आणि ही नागमोडी चढण संपताना रस्ता जिथं उजवीकडे वळतो त्याच ठिकाणी डाव्या बाजूला झाडीत आपल्याला चिरेबंदी बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. हाच विजयगड.या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा काही तपशील उपलब्ध नाही.
सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये "शिस्टुरा हिरण्यकेशी" (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
यासंबंधीची अधिसूचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे सुपुत्र तेजस ठाकरे व शंकर बालसुब्रमण्यम यांनी लावला आहे. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे ,
अशी मागणी होती.यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता आबोली येथील शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली ,
जय गणेश मंदिर , मेढा , मालवण : कालनिर्णय दिनदर्शिकेचे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर. अतिशय स्वच्छ, सुंदर निसर्गमय व मन प्रसन्न करणारा परिसर व त्यात आपले लाडके बाप्पा.शुद्ध सोन्याची गणेश मुर्ती सुवर्ण चौरंगावर विराजमान आहे.
गणेशाच्या दोन्ही बाजूस ऋद्धि-सिध्दी आणि मूषक असे हे दर्शन घेतल्यावर "जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती" चा अनुभव येतो. सभामंडपाच्या गाभाऱ्यात घुमटावर आतल्या बाजूने गणेशाच्या आठ मुर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. सिद्धी च्या हातात ढोल व तलवार आहे आणि ऋद्धि च्या पेन व पेपर.मकर संक्रांतीवेळी सूर्याची कोवळी किरणे थेट गणेशाच्या मूर्तीवर पडतात ,