नमस्कार मित्रांनो. मी @MarathiWord यांचा आभारई आहे की याही वर्षी #ट्विटरसंमेलन या उपक्रमात त्यांनी मला #ट्विटव्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. अधिक काही न बोलता सरळ आजच्या विषयाकडे वळूया- श्रवणसंस्कृती.
जशी वाचनसंस्कृती एखाद्या समाजात महत्त्वाची आहे, तशीच श्रवणसंस्कृतीही
‘रसिक श्रोते हो...’

कार्यक्रमाची ही सुरुवात आपण सर्वांनीच असंख्य वेळा ऐकली आहे. बालगंधर्व त्यांच्या श्रोत्यांना ‘रसिक मायबाप’ म्हणत असत. हे केवळ पोकळ शब्द नव्हते. बालगंधर्व या रसिकतेचं मोल ओळखून होते. #ट्विटरसंमेलन
श्रोता संगीतकलेला पूर्णत्व देत असतो. काही प्रतिभावंत तर असंही म्हणाले आहेत की ‘रसिक हा मूक कलाकारच असतो!’ माझ्यासारख्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे श्रोता! #ट्विटरसंमेलन
यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकाराला श्रोत्याच्या या भूमिकेतून जाणं - किंबहुना श्रोत्याच्या भूमिकेत राहणं - केवळ अनिवार्य आहे. मी पाहिलेले अनेक उत्तम गायक, वादक, संगीतकार फार उत्तम ऐकतात. #ट्विटरसंमेलन
पण जितकी चर्चा वाचनसंस्कृतीबद्दल होते तितकी या श्रवणसंसकृतीबद्दल होताना दिसत नाही. मला वाटतं याला एकच कारण आहे. आपण आपल्या या गुणाला काहीसं गृहित धरतो. लहान मुलांनासुद्धा ‘बोलायला’ शिकवण्याची आपल्याला जबाबदारी वाटते पण ऐकायला ते आपोआप शिकतील असं आपल्याला वाटतं! #ट्विटरसंमेलन
‘रसिक श्रोते हो...’ हे शब्द आपण असे एकत्र ऐकत असलो तरीही श्रोत्यापासून रसिक होण्याचा प्रवास हा कारागीरापासून कलाकार होण्याच्या प्रवासाइतकाच खडतर असतो. रसिकत्व कुणी बहाल करू शकत नाही, ते कमवावं लागतं. #ट्विटरसंमेलन
बालगंधर्वांसारखा कलाकार जेव्हा ‘रसिक मायबाप’ म्हणून समोरच्या श्रोत्याला संबोधतात तेव्हा ते माणसातल्या रसिकत्वाला संबोधत असतात. #ट्विटरसंमेलन
प्रत्येक कलाकाराला दाद हवी असते. आरती प्रभू म्हणतात - ‘दाद द्या अन् शुद्ध व्हा!’ दुसरीकडे अशोक बागवे म्हणतात- ‘कलाकाराचं मरण दोनदा! हवी तिथे दाद आली नाही की आणि- नको तिथे दाद आली की!’ थोडक्यात- नुसती वाहवा कलाकारालाही नकोच असते. ती योग्य ठिकाणी आली तरच त्याची किंमत!#ट्विटरसंमेलन
कला आणि संगीत अशाच ठिकाणी बहरतात जिथे उत्तम, चोखंदळ, आणि जाणकार रसिकता बहरते. #ट्विटरसंमेलन
या पिढीचा एक संगीतकार म्हणून एक तक्रार सतत माझ्या कानावर पडत राहते-
“हल्लीच्या संगीताचा दर्जा आता पूर्वी इतका राहिला नाही. त्यामुळे हल्लीची गाणी दीर्घ काळ रसिकांच्या मनात दरवळत नाहीत जशी जुनी गाणी दरवळतात.” #ट्विटरसंमेलन
या कलेचा आणि व्यवसायाचा एक प्रतिनिधी म्हणून मी या तक्रारीकडे गांभीर्याने बघतो. या तक्रारीमध्ये तत्थ्य असलं तरी त्याची कारणमिमांसा अनेकदा एकांगी होते आणि याचा संपूर्ण दोष हा कलाकारांवर लादला जातो. पण याचं निराकारण करायचं असेल तर याचा जरा खोलवर जाऊन विचार करायला हवा. #ट्विटरसंमेलन
काळ बदलला की संगीत बदलतं हे निर्विवाद सत्य आहे. पण या बदलाचं प्रतिबिंब जितक्या लवकर आणि थेट भावसंगीतात किंवा चित्रपटसंगीतात दिसतं तितकं ते अभिजात संगीतात किंवा लोकसंगीतात दिसत नाही. किंबहुना भावसंगीत किंवा चित्रपटसंगीत हा समाजमानाचा आरसा आहे असं आपण म्हणू शकू. #ट्विटरसंमेलन
लोकसंगीतामध्ये काळ जवळजवळ गोठून राहिलेला असतो आणि अभिजात संगीत काळाच्या या बदलांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत असतं. तरीही आज शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं स्वरूपही बदललं आहे हे मान्य करावंच लागेल. #ट्विटरसंमेलन
अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत तीन-तीन तास चालणाऱ्या मैफिलींचा वेळ आता दीड-दोन तासांवर आला आणि एका कार्यक्रमात एका कलाकाराऐवजी आता तीन-तीन कलाकार दिसू लागले. #ट्विटरसंमेलन
भावसंगीतात व चित्रपटसंगीतात मात्र हे बदल झपाट्याने आणि तितक्याच ठळकपणे प्रतिबिंबित झाले. जागतिकीकरणाने आणिगेल्या काही वर्षांमध्ये संगीतातही तंत्रज्ञानाचा अमल वाढला. तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, पण आणखी एक महत्त्वाचा घटकही बदलला आणि तो म्हणजे श्रोता आणि श्रवणसंस्कृती! #ट्विटरसंमेलन
गाण्याचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीत आणि प्रक्रियेत फरक पडल्यामुळेही संगीताचा पोत बदलतो असा माझा अनुभव आहे. #ट्विटरसंमेलन
बालगंधर्व चित्रपटावर काम करत असताना त्या काळातल्या संगीताचाच अभ्यास केला नाही तर त्या निमित्ताने तेव्हाच्या श्रवणसंस्कृतीबद्दलही जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. #ट्विटरसंमेलन
त्यावेळी मराठी मध्यमवर्गीय माणसाचं संगीत ऐकण्याचं एकमेव स्थान म्हणजे कीर्तनं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या नाटकांचं संगीत देताना प्रामुख्याने कीर्तनपरंपरेतल्या चालींचा उपयोग केला. साकी, दिंडी, कामदा, या छंदांमध्ये नाटकाची पदं रचून ती रंजक केली. #ट्विटरसंमेलन
संगीत सौभद्रचं संगीत पं. भास्करबुवा बखले यांनी केलं आणि त्यांनी अनेक उंबऱ्याबाहेर ठेवलेले संगीतप्रकार नाट्यसंगीतात आणून मराठी संगीतश्रोत्यांचा अनुभव अधिक समृद्ध केला. #ट्विटरसंमेलन
उदा० ‘नेसली पितांबर जरी’सारख्या लावणीला ‘वद जाऊ कुणाला शरण गं’च्या रूपात आणून त्यांनी एरवी माडीवर जाऊन कधीही लावणी न ऐकू शकणाऱ्या रसिकांना एक वेगळं दालन उघडून दिलं. #ट्विटरसंमेलन
प्रथम नाट्यसंगीताच्या निमित्तानं आणि नंतर चित्रपटसंगीताच्या रूपानं अनेक संगीतप्रकार गोविंदराव टेंबे आणि मास्तर कृष्णराव यांच्यासारख्या संगीतकारांनी हाताळाले. #ट्विटरसंमेलन
‘शंभो शिवहर करुणाकर हे विश्वेशा’ या ब्रिटिश बॅंड पथकाच्या धुनेवर आधारलेल्या नांदीपासून तर ‘नाही मी बोलत नाथा’ हे ‘हमसे न बोलो राजाजी’ या ठुमरीवरून घेतलेल्या पदापर्यंत नाट्यसंगीत आपल्यामध्ये नवनवीन प्रवाह सामावतच राहिलं. #ट्विटरसंमेलन
लोक नाटकांना गर्दी करू लागले ते केवळ नाट्यासाठी नव्हे तर त्यातल्या संगीतासाठी. बालगंधर्वांसारख्या प्रतिभावंत गायकाचं गाणं ऐकण्याकरिता लोक मैलोन्मैल प्रवास करून यायचे. त्यावेळी संगीत ऐकायचं असेल तर प्रत्यक्ष ऐकणं हाच एक पर्याय होता! #ट्विटरसंमेलन
या श्रवणसंस्कृतीत पहिली क्रांती केली ती रेडियो आणि ग्रामोफोन या दोन यंत्रांनी. ग्रामोफोन घरी बाळगण्याची चैन सगळ्यांनाच उपलब्द्ध नव्हती त्यामुळे रेडियो हे सामान्य लोकांचं श्रवणाचं साधन बनलं. #ट्विटरसंमेलन
याच दरम्यान गजाननराव वाटवे, जे.एल्. रानडे आणि जी.एन्. जोशींसारख्या गायक—संगीतकारांनी भावगीत हा गायनप्रकार लोकप्रिय केला. वाटवेंच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी व्हायची असं आम्ही आजही ऐकतो. #ट्विटरसंमेलन
भावगीताने गीतकाव्य हा प्रकार लोकप्रिय केला आणि नाट्यसंगीताच्या पदांमधून वापरल्या जाणाऱ्या काहीशा क्लिष्ट भाषेपासून मराठी गीताने फारकत घेतली. उत्तम कविताही संगीतबद्ध होऊ लागली. यशवंत, अनिल, गिरीश, ना.घ. देशपांडे असे कवी गाण्याच्या रूपाने घरोघरी पोचले. #ट्विटरसंमेलन
रेडियो भारतात साधारण १९३० साली आला आणि टीव्ही येईपर्यंत म्हणजे साधारण १९७२ पर्यंत - जवळजवळ चाळीस वर्ष रेडियोने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गाणारा कलाकार दिसत नसे पण त्याचा आवाज एखाद्या कुटुंबीयाइतकाच परिचित वाटायचा! #ट्विटरसंमेलन
टीव्ही आल्यानंतरही रेडियोचा अंमल पुरा उतरला नव्हता पण कमी झाला. आवाजाला चित्राची जोड मिळाली आणि या श्रवणसंस्कृतीला पहिला मोठा धक्का बसला. गाणं ऐकण्याबरोबर ते पाहणं हा गाणं अनुभवायचा एक अविभाज्य भाग झाला. #ट्विटरसंमेलन
एकीकडे छायागीत, चित्रहार अशा कार्यक्रमांतून चित्रपटात चित्रित केलेली गाणी दिसायची आणि ‘शब्दांच्या पलिकडले’सारख्या कार्यक्रमांतून प्रत्यक्ष गायक, संगीतकार मंडळी दिसू लागले. #ट्विटरसंमेलन
आज आपली संगीत ऐकण्याची पद्धत आणि प्रक्रिया पूर्णतः बदलली आहे आणि याचा परिणाम संगीतनिर्मितीवरही पडताना दिसतो. #ट्विटरसंमेलन
माध्यमांचा स्फोट झाला. जुनी माध्यमं तर निकालात निघालीच पण नव्याने येणारी माध्यमंही झपाट्याने कालबाह्य होऊ लागली. सीडी हे माध्यम रुजेरुजेपर्यंत कालबह्यही झालं होतं. #ट्विटरसंमेलन
१०-१० गाण्यांच्या सीडीज, तबकड्या, कॅसेट गेल्या आणि हजारो गाणी mp3 रूपाने छोट्याशा पेन ड्राइव्हवर उपलबद्ध होऊ लागली.#ट्विटरसंमेलन
टीव्हीच्या एकाच वाहिनीची सत्ता संपली आणि हजारो वाहिन्यांनी आसमंतात गर्दी केली! #ट्विटरसंमेलन
याचा परिणाम असा झाला की श्रोत्याचा लक्ष-कालावधी (attention span) कमी झाला. आता श्रोता अधिक चंचल आणि काही प्रमाणात अधीरही झाला. त्याचं लक्ष वेधून घेण्याकरिता अनेक माध्यमांमध्ये झटापट सुरू झाली. #ट्विटरसंमेलन
संगीत ऐकणं हा येताजाता करण्याचा व्यवहार होऊ लागला. प्रवासात, गाडीत, बसमध्ये, काम करता करता, असं संगीत आता जास्त ऐकलं जातं. #ट्विटरसंमेलन
शिवाय पूर्वी मित्र किंवा आप्तांबरोबर बसून एकत्र संगीत ऐकलं जायचं ते आता एका इयरफोनवर एकेकट्यानं ऐकू जाऊ लागलं. संगीत ‘शेअर’ करणं म्हणजे फेसबुक किंवा व्हॉट्सॅपवर! एकत्र एकत्र ऐकणे नव्हे! #ट्विटरसंमेलन
मैफलींचे ‘इव्हेंट’ होऊ लागले तशी फक्त घोषणांच्या पोताचं संगीत जास्त वाजू लागलं. हळुवार - या हृदयीचे त्या हृदयी - असं हितगुज करणारं संगीत ऐकायला मंचच उरला नाही! #ट्विटरसंमेलन
आज तुम्ही शहरातल्या एखाद्या कॉफी शॉपमध्ये डोकावलंत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की एक नसून चार चार टीव्हीचे पडदे असतात. #ट्विटरसंमेलन
प्रत्येक पडद्यावर एक वेगळी वाहिनी सुरू असते आणि जे संगीत वाजत असतं त्याचा या चारही पडद्यांवरून दाखवण्यात येणाऱ्या दृश्याशी सुतराम संबंध नसतो. एका अर्थानं आपल्या शहरांच्या स्किझोफ्रेनिक व्यक्तिमत्वाचं हे द्योतक आहे. #ट्विटरसंमेलन
पंधरा वर्षांपूर्वी टीव्ही मालिकांमधलं पार्श्वसंगीत आणि आजच्या टीव्ही मालिकांमधलं पार्श्वसंगीत याची आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की आजच्या मालिकांमध्ये पार्श्वसंगीताचा वापर वाढलाय. #ट्विटरसंमेलन
आता एपिसोडमध्ये क्वचितच तुम्हाला एखादी शांत जागा सापडेल. पूर्वी २२ मिनिटांच्या एपिसोडमध्ये १०-१४ मिनिटं संगीताचा ऐवज असायचा. आज २२ मिनिटांमध्ये किमान २१ मिनिटं पार्श्वसंगीत वाजतं. #ट्विटरसंमेलन
कारण प्रेक्षकांचं लक्ष सतत धरून ठेवण्याचा हा अतिरिक्त भारही आता पार्श्वसंगीत सांभाळतंय. #ट्विटरसंमेलन
गाण्यांचीही तीच गत. गाणं चांगलं आहे की वाईट यापेक्षाही ते लक्षवेधी आहे का? याकडे संगीत निर्मात्यांचं लक्ष असतं. याचा परिणाम असा झाला की छोट्या स्वरवाक्यांची आणि हुकलाइन असलेली गाणी जास्त निर्माण होऊ लागली. #ट्विटरसंमेलन
ज्या स्वरवाक्याची पुनःपुनः पुनरावृत्ती होत राहते त्याला हुकलाइन म्हणतात. उदा० ‘माऊली माऊली’ किंवा ‘कजरारे कजरारे’ या हुकलाइन्स आहेत. शिवाय तालप्रधान गाणी जास्त बनू लागली. #ट्विटरसंमेलन
ह्याचा जरा सविस्तर खुलासा मी एका कार्यक्रमात केला होता. त्याचा काही भाग तुम्हाला इथे पहायला आणि ऐकायला मिळेल - #ट्विटरसंमेलन
आज आपल्याला उत्तेजित करणारी किंवा उत्तेजित ठेवणारी गाणी ज्या प्रमाणात बनतात त्या प्रमाणात तुम्हाला शांत करणारी गाणी कमी तयार होतात याचं कारण हेच! #ट्विटरसंमेलन
श्रवणसंस्कृती टिकून राहण्याकरिता जसे प्रयत्न संगीतकार, गीतकारांनी करणं आवश्यक आहे तसं त्यांना एक सकारात्मक साथ ही श्रोत्यांकडूनही मिळायला हवी. #ट्विटरसंमेलन
श्रवण ही केवळ एक निष्क्रीय घटना नसून संगीताला दिलेला एक सकारात्मक प्रतिसाद आहे हे आपण कायम ध्यानात ठेवलं तर ही श्रवणसंकृती बहरेल आणि ‘रसिक श्रोते हो…” या शब्दप्रयोगाला पुन्हा एकदा अर्थाची झळाळी प्राप्त होईल! #ट्विटरसंमेलन
आणि इतकं बोलून मी माझं #ट्विटव्याख्यान संपवतो. माझं म्हणणं तुम्ही शांतपणे ऐकलंत ही आपल्या जाणत्या श्रवणसंस्कृतीची एक खूणच आहे असं मी मानतो! असाच लोभ असू द्या. #ट्विटरसंमेलन या उत्कृष्ट उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो! 🙏
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member and get exclusive features!

Premium member ($3.00/month or $30.00/year)

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!