*आटपाट नगर होतं* ......
श्रावण सुरु झाला की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आठवतात त्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराच्या कहाण्या. आजीने मनोभावे सांगितलेल्या आणि तांदुळाचे चार दाणे हातात घेऊन चित्तभावाने ऐकलेल्या.
आपल्या प्रत्येक कहाणीत काहीतरी शिकवण आहेच,...(१)
विशिष्ट लयीत सांगितलेल्या कहाण्या मनात घर करुन रहातात.
दिव्याच्या आवसे पासून कहाण्या सुरु होतात.अंधःकार दूर करणाऱ्या दिव्याला लखलखीत करुन पूजन करायचे.अज्ञानाच्या तमाला उजळून टाकण्यासाठी ज्ञानाची ज्योत तेवत ठेवायची एवढेच नव्हे तर ज्योतीने ज्योत लावत सगळे जग ज्ञानाने....(२)
प्रकाशमान करायचे.
सोमवारची कहाणी कधी शिवामूठीची तर कधी खुलभर दुधाची. एकात शिवभक्तीचा महिमा. नावडत्या सुनेसाठी औट घटकेचे वैभव दाखवणारा, तर दुसरीत घरच्या दारच्यांच्या, प्राणीमात्रांच्या तृप्तीतच वसत असलेला महादेव.
मंगळवारची कहाणी ऐकताना साप कऱ्यात शिरल्यावर कऱ्याचे ....(३)
तोंड करकचून बांधून दुसरे दिवशी आईला वाण दिल्यावर त्यातून रत्नहार निघे पर्यंत जीव मुठीत असायचा. " वाटच्या वाटसरुला,त्यातून अल्पायुषी मुलाला आपली मुलगी कशी दिली? "हा प्रश्न मात्र वटारलेल्या डोळ्यात विरुन जायचा. धर्मावरील अतूट विश्वास आणि सौभाग्यासाठी कसलेही साहस करायची....(४)
शिकवणच नाही का ही ?
बुध बृहस्पतींच्या कहाणीनी तर झणझणीत अंजनच घातलं. " आमचे हात रिकामे नाहीत " असं कधी म्हणायचं नाही.असं म्हणतांना हात खरोखरच रिकामे होतात मग देण्यासारखं काहीच उरत नाही हातात. म्हणून दारी आलेल्याला विन्मुख पाठवायचं नाही....(५)
शुक्रवारची कहाणी तर फारच आवडीची. श्रीमंत भावाने सहस्रभोजनाचा संकल्प सोडला पण गरीब बहिणीला मात्र भरल्या ताटावरुन उठवून दिले.गरीबीची अवहेलना न सहावून बहिणीचा स्वाभिमान जागृत झाला. अखंड परिश्रमाने मिळवलेल्या वैभवाने दिपून जाऊन भावाने भोजनाचे आमंत्रण दिले असता दागदागिन्यांना...(६)
घास भरवून भावाने केलेल्या अपमानाची जाणीव करुन देणारी बहीण स्वाभिमान आणि सडेतोडपणाचे मूर्तीमंत उदाहरणच होय. " असेल मनी तर पुसेल कुनी " ही शिकवण यातूनच मिळते. पडत्या काळात सख्खे असले तरी आपलेही परकेच होतात याची जाणीव करुन देणारी...(७)
आपलं मूल दुसऱ्या कुणाला तरी दिलं आहे याची मनोमन खात्री असणारी आई नेमस्त जीवनाचा स्वीकार करुन आपल्या संतती कुठेही असो त्याच्या कल्याणाची, सुखाची कामना करणारी जिवतीची कहाणी डोळ्यात पाणी आणायची.
शनिवारी शनिदेव कुष्ठरोग्याच्या रुपाने आले....(८)
गरीबी असूनही तुटपुंज्या सामुग्रीवर त्यांना तेल लावून, जेवायला घालून संतुष्ट केलेल्या सुनेवर शनिदेव प्रसन्न झाले आणि अमाप संपत्ती देऊन तिचे दारिद्रय कायमचे दूर केले.
दुःखी , रोग्यांची किळस वा अवहेलना न करता त्यांची सेवा करण्याचा संदेशच यातून मिळतो नां ?....(९)
या कहाणीत *केनाकुर्डु* च्या भाजीचा उल्लेख येतो. यातून रानभाज्यांचे महत्व अधोरेखित होतेच. पण मला वाटते यात कुष्ठरोग बरे करणारे, प्रतिबंधित करणारे औषधी गुणही असावेत. यावर संशोधन व्हायला नको कां ?
आदित्य राणूबाईच्या कथेत बापाची कहाणी न ऐकता निघून जाणारी राणी,....(१०)
दारिद्रय आल्यावर मुलांना मावशीकडे पाठवून मदत मागणारी आणि तिला धडा शिकवणारे सूर्यदेव.शिदोरीतली मदत घारीच्या रुपाने काढून घेणारे,नारळातली मदत विहिरीत घरंगळवणारे, काठीतील मदत गुराख्याच्या रुपाने काढून घेणारे आत्मनिर्भरतेचाच इशारा नाही देत का? कोणाच्या मदतीवर किती अवलंबून रहाणार?.११
अशीच प्राणीमात्रांबद्दलच्या कृतज्ञतेची नागपंचमीची कहाणी अनाथ मुलीसाठी माहेरचा सांगावा नेऊन तिला माहेरपण घडवणारा नाग.
पोळ्याच्या सणाचं महत्व.
अशी कहाण्यांची लयलूट असलेला श्रावण महिना.हिरवीगार झालेल्या,फुलांनी बहरलेल्या सृष्टीचे सौंदर्य आगळेच.प्रत्येक देवतेचे फूल, पान निराळे.१२
म्हणजे उपयोगी , औषधी वनस्पतीच त्या ! अंगणात ही झाडे असली तर डाॕक्टर घरच्याघरीच हा हेतू. आता अंगण गेले आणि हेतू पण ! उरलयं फक्त सक्काळी उठून वाकड्या काठ्या सळया घेऊन लोकांच्या झाडाची फुले तोडायची. तोडायची कसली ओरबाडायचीच. बेहत्तर आहे एका फुलासाठी मोठ्ठी कळ्यांनी....(१३)
फांदी तुटली तरी. " माझं ते तर माझं,पण तुझंही माझच " ही वृत्ती कशी बळावली? आयतं घेणं, दुसऱ्याचं ओरबाडून घेणं ही आपली संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीतल्या दानाच्या महत्तेचा....(१४)
फायदा घेऊन आयतं खाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं नाही कां जाणवत ? कहाण्या नामशेष झाल्याचा परिणाम तर नाही हा ? लहानवयात या कहाण्यातला अर्थ कळत नाही....(१५)
लहानवयात या कहाण्यातला अर्थ कळत नाही . केवळ अद्भुत कथा भक्तिभावानी ऐकायच्या पण जाणत्या वयात त्यातला अर्थ शोधायला नको का? प्रत्येक कहाणीत शिकवण आहे. एकंदरच आपल्या संस्कृतीतील भक्ती,त्याग,सेवा,....(१६)
निसर्गा विषयीची कृतज्ञता, परिश्रमाचे महत्व सांगणाऱ्या या कहाण्या. केवळ वसा घेऊन समृद्धी आली म्हणता? छे ! छे ! परिश्रमाला पर्याय नाही. स्वाभिमान , निश्चय आणि कठोर परिश्रमाच्या फळानेच असाध्य ते साध्य होते..१७
आजकाल या कहाण्यांचा विसर पडलेला दिसतो. पूर्वी यातूनच कसं वागावं आणि कसं वागू नये याचे संस्कार व्हायचे म्हणून अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणाची गरज पडत नव्हती.अजूनही काही रितीरिवाज पाळले जातातच पण त्यात सोपस्कार व दिखाऊपणाच जास्त असे नाही का वाटत ? अर्थात् आजकाल वेळही नसतो आणि रसही..१८
मुख्य म्हणजे आपलं ते सगळं टाकाऊ, परंपरा म्हणून करायचे हीच भावना जास्त.
मंगळागौर म्हणजे event झाला आहे. पूर्वीच्या मंगळागौरीच्या खेळांचे पुनरुज्जीवन होतांना दिसते आजकाल पण क्वचितच. जागरण तर विस्मृतीतच गेल्यासारखे आहे. अर्थात अपवादही आहेतच. चालायचेच पिढी दर पिढी बदल होणारच..१९
कोरोनाच्या निमित्ताने का होईना " आजीच्या बटव्यातल्या " औषधांना मानाचे स्थान मिळाले आहे. परदेशातही यावर संशोधने व्हायला लागलीत .आपल्या संस्कृतीची महत्ता जगला पटल्याची ही पावतीच नव्हे काय ?
संस्कारांचेही बीज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रुजलेले आहेच...(२०)
त्याशिवाय का कोरोना काळात एवढी संवेदनशीलता आढळून आली ? अजूनही कोरोना योद्धा आपल्यासाठी लढताहेत आणि त्याची जाणीव ठेऊन ठिकठिकाणी त्याविषयी कृतज्ञताही व्यक्त होते आहे , गरजूंसाठी मुक्त हस्ताने मदत दिली जाते आहे.
पण आजीच्या कहाणीतील
"ऐका......तुमची कहाणी आटपाट नगर होतं....(२१)
तिथे एक ...." "करा रे हाकारा , पिटटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या ,उपाशी नाही काही नाही एक......".....(२२)
अग ! अग ! पापिणी , बापाची कहाणी ऐकली नाहीस .....' " वनात नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या ." बाई बाई कोणता वसा वसतात तो मला सांगा". तुला गं वसा कशाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील "....(२३)
🌳वटसावित्री🌳
आज वटपौर्णिमा, काल पासूनच समाजमध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सवित्रिपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही....१/n
पण कुणा एकाची स्तुती करताना किंवा महत्त्व सांगताना दुसऱ्यावर टीका केलीच पाहिजे का? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्त्व वाढते का?
काय जाणून घेतलं आपण सत्यवनाच्या सावित्री बद्दल? केवळ व्रत वैकल्य, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा, फेऱ्या घाला इतकाच?....२/n
सत्यवान सावित्रीचे आख्यान महाभारताच्या वनपर्वात येते. मद्र देशाचा राजा अश्वपतीची रूपवान, गुणवान, बुद्धिमान अशी ही कन्या सावित्री. तर्कशुद्ध विचार मांडणारी, वादविवादात प्रवीण,स्वतंत्र विचाराची. ती उपवर झाली तेंव्हा आश्र्वपतीने तिला आपला वर निवडण्याची मुभा दिली....३/n